जिल्हा बॅंकेच्या स्थापनेत आर. डी. पाटील यांचे योगदान मोलाचे : रामराजे नाईक-निंबाळकर

सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा बॅंकेच्या स्थापनेत माजी अध्यक्ष रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी. पाटील यांचे योगदान मोलाचे होते, असे प्रतिपादन बॅंकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. जिल्हा बॅंकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष आर. डी. पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रामराजे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या स्थापनेबरोबरच इतर सहकारी संस्थांच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या आर. डी. पाटील यांच्यासारख्या नि:स्वार्थी व निष्कलंक शिलेदाराच्या उल्लेखाशिवाय सहकाराचा इतिहास अपूर्ण आहे. संचालक व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर. डी. पाटील यांनी सहाय्य केले. अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, रघुनाथराव पाटील यांचे सहकार क्षेत्रातील कार्य दीपस्तंभासारखे आहे. उपाध्यक्ष सुनील माने म्हणाले, 1947-48 मध्ये कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे सलग 17 वर्षे अध्यक्ष, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्य सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष व संचालक, राज्य सहकारी दूध संघाचे अध्यक्ष, कोयना सहकारी दूध प्रकल्पांचे अध्यक्ष, अशी रघुनाथराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील, आबासाहेब वीर यांचे नेतृत्व लाभल्याने बॅंकेची सुरुवातीपासूनच प्रगती झाली आहे.
या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर बॅंकेने जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटस्साठी एक कोटी रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत केली आहे. या व्यतिरिक्त बॅंकेच्या संचालकांचा सभा भत्ता, बॅंकेचे अधिकारी व सेवकांचे एक दिवसाचे वेतन मिळून 16 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करण्यात आली आहे. संचालक आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, नितीन पाटील, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुन खाडे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, अधिकारी व सेवकांनी आर. डी. पाटील यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले.





