पूर्व हवेलीत घरादारांत, शेतात पाणीच पाणी…

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती परिसरातील परिस्थिती
लोणी काळभोर – हवेली तालुक्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. परिणामी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
शेतातील फुलं, कोथिंबीर, पालक आदी भाजीपाला वर्गीय पिके भुईसपाट झाली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
दोन दिवस पडलेल्या प्रचंड पावसामुळे पाटील वस्ती येथे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसाने बळीराजा अगदी मेटाकुटीला आलेला आहे. गेले वर्षभर शेतकऱ्यांवर एकामागून एक अशी संकटे येत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट अक्षरशः कोलमडून पडले आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन शेती उत्पादीत मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. तरी शासनाने गांभीर्याने याचा विचार करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
लोणी काळभोर येथील मांडाळा, कोंडे वस्ती परिसरातील लक्ष्मीदरा बंधारा पावसाच्या पाण्याने गच्च भरला आहे. तो फुटण्याची दाट शक्यता होती. हा बंधारा फुटला तर लोणी काळभोर गावामध्ये पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला होता. वनविभागाचे वनपाल बळीराम वायकर यांच्या मदतीने बंधाऱ्याच्या एका बाजूने पाणी काढून देण्यात आले. यावेळी हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, माजी उपसरपंच राजाराम काळभोर, अमित काळभोर उपस्थित होते.





