थंडीत गावरान अंड्यांचे भाव कडाडले

संगमनेर – यंदा उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या सगळीकडेच कडाक्याची थंडी पडत आहे.अशातच गावठी कोंबड्यांच्या अंड्यांना मागणीही मोठी वाढली आहे. दहा रूपये एका नगाला मोजूनही अंडे मिळत आहे. त्यामुळे अंडे खाणाऱ्यांची आठवडे बाजारांमध्ये गर्दी होत आहे, तर अनेकजण वाड्या-वस्त्यांवरही चकरा मारत आहेत.
पूर्वी ग्रामीण भागात व वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गावठी कोंबड्या होत्या. कालांतराने गावठी कोंबड्या खूप कमी झाल्या असून, क्वचितच आता वाड्या-वस्त्यांवर पहावयास मिळत आहे. यामध्ये बॉयलर व आरआर कोंबड्याची जात आली असली तरी आजही गावठी कोंबडीलाच मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्यांना गावठी कोंबडी किंवा अंडे खायचे ते लोक मिळेल, त्या भावाने वाड्या-वस्त्यांवर जावून कोंबड्या व अंडे खरेदी करतात. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात नेहमीच आपण ऐकत असतो. अंडे शरिरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक असल्याने थंडीमध्ये अंडे खाणे शरीरासाठी चांगले असते.
आहारात पालेभाज्या, दूध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंडे खाल्ल्याने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडिन, झिंक असे बहुतांशी घटक शरिराला मिळत असतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, असे आहार तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आता गावठी अंड्यांना मागणी वाढत चालल्याने या अंड्यांचे भावही चांगलेच कडाडले.
दहा रुपयाला एक अंडे मिळत आहे. तरीही अंडे मिळत नसून अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर आदी भागातून कोंबड्यांचे व्यापारी गावठी कोंबड्या व अंडे खरेदी करण्यासाठी घारगाव व साकूरच्या आठवडे बाजारात येत आहेत. काही व्यापारी थेट वाड्या-वस्त्यांवर नजरेस पडत आहे.





