सुरतमध्ये स्थलांतरित मजूर पुन्हा उतरले रस्त्यावर

मूळ गावी जाण्याच्या मागणीसाठी निदर्शने
सुरत : गुजरातच्या सुरत शहरात स्थलांतरित मजूर पुन्हा रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन असला तरी मूळ गावी जाण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी निदर्शने केली. याआधी शुक्रवारी स्थलांतरित मजुरांनी केलेल्या हिंसक निदर्शनांमुळे सुरतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास सुरतमधील एका भागात मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर जमा झाले. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लॉकडाऊनमुळे मूळ गावी जाता येणार नाही. संयम बाळगा, असे आवाहन करून पोलिसांनी त्यांची समजूत काढली.
त्यानंतर काही मजुरांनी अन्न मिळत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने खाद्यपदार्थ उपलब्ध केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे समजते. सुरत हे हिऱ्यांना पॉलिश करणारे केंद्र म्हणून ओळखले जाते. त्या शहरात वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखानेही आहेत. दरम्यान, निदर्शने करणारे मजूर प्रामुख्याने उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशाचे रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली.





