LPG Cylinder Shortage : पुन्हा करोनासारखी परिस्थिती? गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे कामगारांचे गावाकडे पलायन
करोना काळातील लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा स्थलांतरित कामगारांवर गावाकडे परतण्याची वेळ आली आहे.

LPG Cylinder Shortage – करोना काळातील लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा स्थलांतरित कामगारांवर गावाकडे परतण्याची वेळ आली आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाचा परिणाम गुजरातमधील सूरत शहरावर दिसू लागला असून एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे अनेक कामगार शहर सोडत आहेत.
सूरतमधील टेक्स्टाईल उद्योगात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामधील हजारो कामगार कार्यरत आहेत. मात्र गॅस सिलिंडरचा खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबांनी परतीचा निर्णय घेतला आहे. उधना जंक्शन रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून कामगारांची मोठी गर्दी दिसत आहे.
डायिंग-प्रिंटिंग मिलमध्ये काम करणारे सुभाष ठाकूर यांनी सांगितले की, पूर्वी ५ किलोचा सिलिंडर सुमारे ५०० रुपयांत मिळत होता, मात्र आता त्याच रिफिलचा दर २५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने कुटुंबाचा खर्च भागवणे अशक्य झाले आहे.
कामगारांच्या पलायनामुळे सूरतच्या वस्त्रोद्योगासमोर मनुष्यबळाचे संकट उभे राहिले असून काही कारखाने आठवड्यातून एक-दोन दिवस बंद ठेवावे लागत आहेत.
परिस्थिती हाताळण्यासाठी दक्षिण गुजरात वस्त्र प्रक्रिया संघटनेने पांदेसरा येथे सामुदायिक स्वयंपाकघर सुरू केले असून ४०-४५ रुपयांत जेवण उपलब्ध केले जात आहे. येथे दररोज सुमारे ५००० कामगारांसाठी अन्न तयार केले जाते.






