शिरूर रेड झोनमध्ये, अधिक काळजी घ्या

न्हावरे (वार्ताहर) –अरे बाबांनो, आपला शिरूर तालुका ‘रेड झोन’मध्ये आहे. त्यामुळे काळजी घ्या. स्वयंशिस्त पाळा, विनाकारण फिरू नका, असे म्हणण्याची वेळ शिरूर तालुक्यातील प्रशासनावर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका रेडझोनमध्ये असल्यामुळे तसेच तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने लॉकडाऊनचे नियम व अटी काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे जनता स्वयंशिस्तीचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा कमालीची दबावाखाली आहे. पुन्हा एकदा पोलिसांना रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलिसी खाक्या दाखवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अशी परिस्थिती शिरूर तालुक्यात आहे. तालुक्यात आतापर्यंत करोनाचे 11 रुग्ण सापडले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काही उपचार घेत असून, काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
त्यामुळे तालुक्याची एकंदरीत परिस्थिती पाहता प्रशासन व आरोग्य यंत्रणेने करोना विरोधात चांगला लढा दिला आहे; मात्र विविध शहरांतून आलेल्या काही उतावीळ नागरिकांमुळे संपूर्ण यंत्रणा व गावाकडची जनता अडचणीत येऊ शकते, अशी परिस्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरांतून आलेल्या नागरिकांनी करोनाबाबत खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण गावाकडच्या लोकांना करोनाचा धोका गावातल्या लोकांकडून कमी प्रमाणावर असून बाहेरून आलेल्या लोकांपासून अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरांतून आलेल्या लोकांची माहिती पुन्हा अधिक तत्परतेने गोळा करून त्यांना क्वारंटाइन करण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे.
“त्यांच्या’शी मानवतेने वागा
विविध शहरांतून व दूर गावांवरून आलेल्या नागरिकांशी स्थानिक जनतेने मानवतेचा व्यवहार ठेवणे गरजेचे आहे. त्यांना गावात घेताना त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागले पाहिजे, ते नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी किंवा शहरात गेले होते. ते जेथे परतले ते त्यांचेही गाव आहे.





