साताऱ्यात दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा – नोटीस ऑफ इंटिमेशनची पाच प्रकरणे मंजूर करून घेण्याकरता 1500 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन सातारा क्रमांक एक कार्यालयातील उदय धनाजी सूर्यवंशी (वय 42) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांनी दिली. यासंदर्भातील अधिक माहिती अशी ही तक्रारदार 40 वर्षाचा असून नोटीस ऑफ इंटिमेशन प्रकरणाकरिता त्यांनी दुय्यम निबंधक वर्ग दोन सूर्यवंशी यांच्याकडे अर्ज केला होता. या पाच प्रकरणांना मंजुरी देण्याकरिता 1500 रुपये लाचेची त्याने मागणी केली. तक्रारदाराने या प्रकरणाची लेखी माहिती सातारा लाचलुतपत प्रतिबंधक विभागाला कळविली. त्यानुसार 9 मे रोजी या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली.
सूर्यवंशी यांना कार्यालयाच्या परिसरात 1500 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. त्यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने महसूल विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत नलावडे व तुषार भोसले यांनी हा सापळा रचला होता.





