पाटण मतदारसंघात 7 उमेदवारांची माघार निवडणूक रिंगणात राहिले 11 उमेदवार

कोयनानगर/पाटण – पाटण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. महायुतीचे उमेदवार तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या हर्षद कदम यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणकर व देसाई या पारंपरिक विरोधकांमध्ये नेहमीच लढत होते. या विधानसभा निवडणुकीत 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यातील पाच अर्ज छाननीत अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले अर्ज माघे घेतले. त्यामध्ये सयाजीराव दामोदर खामकर (दोन अर्ज), यशस्विनीदेवी सत्यजितसिंह पाटणकर, चंद्रशेखर शंभू कांबळे, प्रकाश तानाजी धस, सर्जेराव शंकर कांबळे, दीपक बंडू महाडिक, सचिन नानासाहेब कांबळे यांचा समावेश आहे.
त्यामुळे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. यामध्ये ना. शंभूराज शिवाजीराव देसाई, सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब रामचंद जगताप, भानूप्रताप मोहनराव कदम, महेश दिलीप चव्हाण, प्रताप किसन मस्कर, संतोष रघुनाथ यादव, सूरज उत्तम पाटणकर, विजय जयसिंह पाटणकर, विकास पांडुरंग कांबळे, विकास संभाजी कदम यांचा समावेश आहे. महायुतीकडून पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष असलेले सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात मुख्य लढत होणार असली, तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे.





