Supriya Sule : “आपल्याच घरात आपण…”; मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
Supriya Sule : लाचखोरी प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, शंका उपस्थित करत तीन महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात लिपिकाने लाच स्विकारतानाच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, विरोधकांकडून नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
दुसरीकडे पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नरहरी झिरवळ यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. अशातच या प्रकरणात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया देत मोठी शंका उपस्थित केली आहे. या शंकेमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. झिरवळांच्या खात्यातील लाचखोरीची टीप कुणी दिली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी पार्दर्शतेने व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच झिरवळांसोबत मी काम केलं आहे. ते शून्यातून वर आले आहे. त्यामुळे झिरवळांबाबत जो आरोप केला जात आहे, त्याबाबत पारदर्शकपणे चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरणं द्यायला हवं, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एसीबी कारवाईचे रिपोर्टिंग कुणाला करत? तर मुख्यमंत्र्यांना करतं. मुख्यमंत्री मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावर बसतात. त्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. या गृहमंत्रालयानेच मंत्रालयातील तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील त्यांच्याच कॅबिनेटमधील मंत्र्याकडे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही का? मग ही तक्रार केली कुणी? असे तीन महत्वाचे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
आपल्याच घरात आपण आपल्याच माणसावर छापा घातला असा हा प्रकार आहे, असे मोठं विधानही सुप्रिया सुळे यांनी केले आहे. टीप कुणी दिली. हे खरं आहे की खोटं आहे याची उत्तरं माझ्याकडं नाहीत. डेटा आणि वास्तव नसल्यास मी त्यावर अधिक भाष्य करणे, बोलणे योग्य नाही. पण मंत्रालयात स्वतःच्याच मंत्र्यांवर असा छापा घालणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर दिली आहे.
हेही वाचा : Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमती आज पुन्हा घसरल्या; चांदी ४,००० रुपयांनी घसरली





