Satara: सुखदुःखाच्या क्षणी गाणे आपला साथीदार बनते
Satara मुकुंद फडके म्हणाले, ‘सातारा शहरामध्ये संगीताची चळवळ टिकवून ठेवण्यासाठी शेख बंधू आणि डॉ. शेख करत असलेले प्रयत्न स्तुत्य व अभिनंदनीय आहेत.’

Satara: “गाणे म्हणजे केवळ शब्द आणि सूर नव्हेत, तर मनाला स्पर्शणारी एक सुंदर भावना आहे. आयुष्यातील सुख- दुःखाच्या क्षणी गाणे आपला साथीदार बनते. कधी ते आठवणींना उजाळा देते, तर कधी मनातील वेदनांना शब्द देते. एखादे गाणे ऐकताना आपण पुन्हा त्या काळात, त्या माणसांत आणि त्या भावनांत हरवून जातो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एखादे गाणे असते, जे कायम मनात जिवंत राहते,” असे मत गायक डॉ. लियाकत शेख यांनी व्यक्त केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘सूरसंगम’ कार्यक्रमामध्ये रफी, किशोरकुमार आणि मुकेश यांच्या हिंदी गीतांची मैफल दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात रंगली. त्यावेळी डॉ. शेख बोलतहोते. यावेळी मुकुंद फडके, डॉ. सारिका देशपांडे, हेमंत कासार, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, शहाबुद्दीन शेख, युनूस शेख आणि राजेश वंजारी उपस्थित होते.
मुकुंद फडके म्हणाले, ‘सातारा शहरामध्ये संगीताची चळवळ टिकवून ठेवण्यासाठी शेख बंधू आणि डॉ. शेख करत असलेले प्रयत्न स्तुत्य व अभिनंदनीय आहेत.’ चित्रपटसृष्टी तसेच स्वातंत्र्यलढ्यात विविध समाजघटकांनी दिलेल्या योगदानाची माहिती वाचली पाहिजे, त्यामुळे समाजाविषयीचे ज्ञान अधिक व्यापक होते, असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. संगीताच्या ‘डोमिनंट’ व ‘रिसेसिव्ह’ बीटचे स्वरुप डॉ. सारिका देशपांडे यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. यावेळी स्वाती शेडगे, शहाबुद्दीन शेख, युनुस शेख, नासिर पालकर, राजेश वंजारी, तुषार पाटील, अमोल जाधव आणि फारुख शेख यांनी रफी, किशोरकुमार व मुकेश यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. गीत- संगीत मार्गदर्शन युनुस शेख यांनी केले. राजेश वंजारी यांनी निवेदन केले.





