Satara: संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
Satara मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा खर्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा सुवर्णदिवस आहे.

Satara: यंदा एल-निनोमुळे राज्यातील काही भागांसह लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, या संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर येथे दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर येथील मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन सोहळ्यात उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे सलामी, मानवंदनेनंतर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील, खा. डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा खर्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा सुवर्णदिवस आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक लढ्यात लातूरच्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींनी आणि सामान्य जनतेने दिलेले योगदान व त्यांचा त्याग प्रेरणादायी आहे. या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने यश मिळाले. या गौरवशाली इतिहासाला साक्षी ठेवून लातूर जिल्ह्याच्या विकासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात परतीच्या पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याने सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी महत्वाचा आहे. सर्वांनीच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी 13 ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.





