महाराष्ट्रात एकाच दिवसात आढळले उच्चांकी 1602 करोनाबाधित

मुंबई -महाराष्ट्रात आणखी 1 हजार 602 करोनाबाधित आढळले. एकाच दिवसातील ती उच्चांकी वाढ ठरली. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या 27 हजार 524 इतकी झाली आहे.
राज्यात याआधी बुधवारी एकाच दिवसातील सर्वांधिक 1 हजार 495 करोनाबाधित आढळले. तो उच्चांक गुरूवारी मागे पडला. राज्यात आणखी 44 करोनाबाधित दगावले. त्यामुळे राज्यातील करोनाबळींच्या संख्येने 1 हजारचा टप्पा ओलांडला. राज्यात सर्वांधिक करोनाबाधित मुंबईत आहेत. त्या शहरात 16 हजार 738 रूग्णांना करोना संसर्ग झाला आहे.
मुंबईत करोनामुळे आतापर्यंत 621 रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. करोनाबाधित आणि मृतांच्या संख्येचा विचार करता राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. देशात करोनाबाधित आणि बळींचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वांधिक आहे.
महाराष्ट्रातील 6 हजारांहून अधिक रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. ती बाब करोना संकटाशी झुंजत असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने दिलासादायक ठरली आहे.





