MP: पुजाऱ्यांना मंदिराची जमीन विकण्याचा अधिकार; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने राजकारण तापले

भोपाळ – मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील मंदिराच्या पुजाऱ्यांना मंदिराची जमीन विकण्याचा अधिकार देण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी भोपाळ मध्ये परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री चौहान यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “मंदिरांच्या कामांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही. आता जिल्हाधिकारी मंदिरांशी संलग्न असलेल्या जमिनीचा लिलाव करू शकणार नाहीत. मंदिरांशी संबंधित पुजारी आता या जमिनींचा लिलाव करू शकतील. ” यावेळी मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण कल्याण मंडळाच्या स्थापनेचीही घोषणा केली.
मात्र, कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या या घोषणा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्या गेल्या आहेत असे म्हटले आहे.कॉंग्रेसचे आमदार पीसी शर्मा यांनी सोमवारी म्हटले आहे की इतकी वर्ष सत्तेवर असताना मुख्यमंत्र्यांना कधी ब्राम्हणांची फिकीर असल्याचे दिसले नाही. कॉंग्रेसने सत्तेवर असताना भोपाळ मध्ये भगवान परशुरामांचा पुतळा बसवला होंता याची आठवणही त्यांनी करून दिली.
दिग्विजय सिंह यांच्या कार्यकाळातही आम्ही ब्राह्मणांबाबत अनेक निर्णय घेतले, पण मुख्यमंत्री चौहान यांनी गेल्या वर्षी परशुराम जयंतीला केलेल्या घोषणा आजतागायत पूर्ण झालेल्या नाहीत. कॉंग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा म्हणाले, “परशुराम जयंतीच्या दिवशी केलेल्या घोषणांची पूर्तता अद्याप का झाली नाही, हे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगावे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा करण्यात आली आहे त्यावर लोकांचा विश्वास नाहीं असेही त्यांनी नमूद केले.





