हरियाणा कॉंग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीने डोके काढले वर

नवी दिल्ली – गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळी झालेल्या निवडणुकीत हरियाणात कॉंग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली. राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असून त्याकडे आता पक्षाचे लक्ष आहे. हरियाणात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते अशी पक्षाच्या नेतृत्वाला खात्री वाटते आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्यामुळे तसा फार कमी अवधी आता राहीला आहे. मात्र कॉंग्रेस श्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यात आता राज्यातील कॉंग्रेस नेतेच अडथळा ठरत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील गटबाजीने पुन्हा एकदा जोरदारपणे डोके वर काढले आहे.
त्याची सुरूवात हरियाणा कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांनी केली. जर निवडणुकीत योग्य प्रकारे तिकिटवाटप झाले असते तर कॉंग्रेसला सर्व १० जागांवर विजय मिळवता आला असता असा दावा त्यांनी केला. यावेळी पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांना खातेही उघडता आले नव्हते.
कुमारी सेलजा सिरसा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत व मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये निश्चितच त्यांचे नाव आहे. सेलजा यांचा जसा गट आहे तर माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान सिंह यांचा दुसरा गट आहे. सेलजा यांच्या गटात राज्यसभा सदस्य रणदीप सुरजेवाला यांचाही समावेश आहे. कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक वेळा या दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.
हुडा यांना हरियाणातील कॉंग्रेसचे सर्वात शक्तीशाली नेते मानले जाते. मात्र निवडणुकीत ते आणि सेलजा गटाचे नेते कधीच एका व्यासपीठावर आले नाहीत. कॉंग्रेसने ९ जागा लढवल्या होत्या. त्यातील सात उमेदवार हुडा यांच्या शिफारसीवरून निवडण्यात आले होते.
यातील चार जण विजयी झाले असून आपला प्रभाव आजही कायम असल्याचे हुडा यांनी सिध्द केले. मात्र आता सेलजा यांनी हुडा यांचे नाव न घेता त्यांच्यावरच निशाणा साधला आहे. आपल्याच कुटुंबाला पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी हुडांवर केला आहे.





