अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बोल्हेगाव परिसरात दागिन्यांच्या लालसेने प्रेरित होऊन चार युवतींनी मिळून ४० वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेच्या घरात घुसून दागिने चोरण्याच्या प्रयत्नात झालेल्या झटापटीत धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मनीषा बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. कौस्तुभ कॉलनी, बोल्हेगाव) असं मृत महिलेचे नाव आहे. नेमकं प्रकरण काय? मनीषा बाळासाहेब शिंदे या दोन्ही पायांनी दिव्यांग होत्या आणि १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी घरी एकट्या होत्या. त्यावेळी आरोपींनी घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मनिषा यांनी आरडाओरड केल्याने घाबरलेल्या आरोपींनी जवळच असलेल्या धारदार शस्त्राने गळ्यावर व हनुवटीवर वार करत त्यांचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह पडला होता. चोरीचा प्रयत्न हत्येत बदलला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा कट मयत महिलेच्या शेजारी माहेर असलेल्या दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय २०) हिने रचला होता. मनिषा यांच्या दागिन्यांची माहिती असल्याने दिव्याने आपल्या तीन साथीदारांना सोबत घेऊन चोरीचा डाव आखला. मात्र, चोरीचा प्रयत्न हत्येत बदलला. याप्रकरणी पोलिसांनी दिव्या विजय खाडे (वय २०), अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय २२, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव, मूळ रा. दिल्ली), दोन अल्पवयीन मुली या चारही जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, दागिने चोरण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद तपास करत हे यश मिळवले आहे. या घटनेने बोल्हेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.