Shraddha Kapoor: लाल रंगाच्या नऊवारी अन् केसात गजरा… श्रद्धा कपूरने अंबाबाईचं दर्शन घेत जिंकली चाहत्यांची मनं
Shraddha Kapoor: 'ईठा' सिनेमा लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा रंगली आहे. या चित्रपटात श्रद्धा एका खास भूमिकेत दिसणार असून, ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील गाण्याला देखील सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘ईठा’च्या प्रमोशनसाठी सिनेमाची टीम कोल्हापूरला पोहोचली. यावेळी श्रद्धाने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेत चाहत्यांची मनं जिंकली. याचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय कोल्हापूरकरांचं प्रेम पाहून श्रद्धा कपूर भारावली. तिने यावेळी कोल्हापूरकरांकडून मिळालेल्या प्रेमाचे कौतुकही केले.
श्रद्धा लाल रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक करत अंबाबाईच्या दर्शनाला गेली होती. तिच्यासोबत ‘ईठा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर देखील होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. श्रद्धाच्या फोटोंवर कमेंट करत “नऊवारी नेसून देवीला गेलीस, जिंकलंस”, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
‘जी जी रे जी’ गाण्यावर लावणीचा विक्रम
याआधी श्रद्धा कपूर पुण्यात देखील आली होती. यावेळी ‘ईठा’ चित्रपटातील ‘जी जी रे जी’ या गाण्यावर एका मिनिटात सर्वाधिक महिला सहभागी होऊन लावणीचे हुक स्टेप्स सादर करण्यात आले. या खास उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या दोन्ही रेकॉर्ड बुक्समध्ये झाली आहे.
या विक्रमासाठी पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक मराठी वेशभूषेत सजलेल्या शेकडो महिला आणि युवती एकत्र आल्या. त्यांनी ‘जी जी रे जी’ गाण्याच्या तालावर लावणीचे हुक स्टेप्स सादर केले. एका मिनिटात इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र लावणी सादर केल्याने हा उपक्रम विशेष ठरला.
दरम्यान, ‘ईठा’ सिनेमा लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. ४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





