Shah Rukh Khan: शाहरुख खानने इन्फ्लुएंसरला पाठवली कायदेशीर नोटीस! सोशल मीडिया रीलमुळे सुपरस्टार संतापला, नेमकं प्रकरण काय?
Shah Rukh Khan माध्यमांच्या वृत्तानुसार, २३ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्या वकिलांनी सुविज्ञ शर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये सोशल मीडिया पोस्टमधील दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुख एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सुविज्ञ शर्मा याला शाहरुख खानने कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. एका इन्स्टाग्राम रीलमधून शाहरुख खानबद्दल दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक दावे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आध्यात्मिक गुरु सद्गुरू यांच्या एका कार्यक्रमात शाहरुख खान सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान इतर पाहुण्यांसोबत संवाद साधताना दिसत आहे.
या व्हिडिओवर इन्फ्लुएंसर सुविज्ञ शर्मा यांनी रील पोस्ट केली होती. या रीलमध्ये त्यांनी शाहरुख खानला संवादादरम्यान शांत राहण्यास सांगितल्याचा दावा केल्याचे वृत्त आहे. या पोस्टमुळे शाहरुख खानच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शाहरुख खानच्या वकिलांनी काय म्हटलं?
माध्यमांच्या वृत्तानुसार, २३ नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्या वकिलांनी सुविज्ञ शर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये सोशल मीडिया पोस्टमधील दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे संवादाचा मूळ संदर्भ बदलून दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे शाहरुख खानची सार्वजनिक प्रतिमा खराब होऊ शकते, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Shah Rukh Khan
भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ चा उल्लेख
या कायदेशीर नोटीसमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३५६ चा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे कलम मानहानीशी संबंधित आहे. नोटीसमध्ये कोणताही ठोस पुरावा नसताना एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचे आणि बदनामीकारक दावे पसरवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप न्यायालयाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
इन्फ्लुएंसरसमोर कोणत्या मागण्या?
माध्यमांच्या वृत्तानुसार, सुविज्ञ शर्मा यांना नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत काही मागण्या पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये इन्स्टाग्रामवरील संबंधित रील तातडीने हटवणे, व्हिडिओशी संबंधित कॅप्शन आणि वक्तव्ये काढून टाकणे किंवा त्यात सुधारणा करणे यांचा समावेश आहे. तसेच, यापुढे संबंधित दावा शेअर किंवा प्रसारित करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर केलेल्या कारवाईची लेखी माहिती देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘किंग’
दरम्यान, शाहरुख खान त्याच्या आगामी ‘किंग’ या अॅक्शन चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच त्याची मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार असल्याचे वृत्त आहे.
शाहरुख खानच्या आगामी चित्रपटासोबतच या कायदेशीर नोटीस प्रकरणाकडेही आता चाहत्यांचे आणि मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.





