2022मध्ये घरांचे दर 5 टक्क्यांनी वाढणार

मुंबई – एकूणच महागाई वाढत असल्यामुळे घरासाठीच्या कच्च्या मालाचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे नागरिकांकडून घरांची मागणी वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये 2022 वर्ष रिऍल्टी क्षेत्रासाठी आशादायक असेल. या वर्षात घरांच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता एका अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
2022 मध्ये रिऍल्टी क्षेत्रासाठी कशी परिस्थिती असले या संदर्भात नाईट फ्रॅंक या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अगोदरचा काळ बांधकाम क्षेत्रासाठी फारसा स्पष्ट पोषक नव्हता. करोना व्हायरच्या काळात या क्षेत्रात बरीच अस्थिरता होती. मात्र 2022 मध्ये या क्षेत्रात स्थिरता नांदेल. निवासी बांधकामाबरोबरच व्यवसायिक बांधकामालाही पूरक परिस्थिती असेल.
कमी व्याजदर आणि घरांचे कमी असलेले दर यामुळे गेल्या काही दिवसापासून घर खरेदीला वेग आला आहे. हा वेग कायम राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आता तुलनेने मोठी घरे आणि अधिक सोयीसुविधा अपेक्षित आहेत. सरलेल्या दशकात भारतात रिऍल्टी क्षेत्रात जीएसटी, नोटबंदी, रेरामुळे सकारात्मक वातावरण तयार झाले असतानाच करोनाने धुमाकूळ घातला. मात्र आता परिस्थिती सकारात्मक होत असून मागणी आणि दर वाढण्याची शक्यता आहे.
नाईट फ्रॅंकचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर वैजल म्हणाले की, 2021 मध्ये करोना असला तरी बांधकामाला आणि विक्रीला वेग आला आहे. आता जर करोनाने आणखी काही नवे प्रश्न निर्माण केले नाही तर हे क्षेत्र वेगाने करोनापूर्व पातळीवर येण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतातील पाच मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचारी नियुक्ती वाढविली असून त्यांच्यासाठी 11.67 दशलक्ष वर्ग फूट इतकी जागा लागणार आहे. यावरून व्यावसायिक क्षेत्रांमधील मागणीचा अंदाज येऊ शकतो. ई-कॉमर्स मधील घडामोडी वाढल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राला लागणाऱ्या जागेची मागणी 20 टक्क्यांनी वाढेल. सध्या या क्षेत्राकडे 31.7 दशलक्ष वर्ग फूट जागा आहे. एकूण परिस्थिती पाहता 2023 मध्ये या क्षेत्राकडील जागा 45.9 दशलक्ष वर्ग फूट असेल. भारतात डेटा सेंटर मोठ्या प्रमाणात विकसित होत असून त्यांनाही बरीच जागा लागणार असल्याचे बैजल यांनी सांगितले.





