Imran Khan : इम्रान खान यांचा पक्ष आंदोलन करू शकणार नाही; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नोंदवले निरीक्षण

इस्लामाबाद : तुरुंगात असेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरिक ए इन्साफ हा पक्ष इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन करू शकणार नाही, असे निरीक्षण पाकिस्तानमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नोंदवले आहे. दोनच दिवसांपुर्वी खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख नेते अली आमिन गंदापूर यांनी ईदपर्यंत इम्रान खान यांची सुटका न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांचे राजकीय व्यवहार विषयाचे विशेष सहायक राणा सनाउल्लाह यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.
पाकिस्तानमधील सत्तारुढ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या सरकारविरोधात तुरुंगातूनच आपण आंदोलनाचे नेतृत्व करणार आहोत, असे इम्रान खान यांनी देखील गेल्या महिन्यात म्हटले होते. इम्रान खान २०२३ च्या ऑगस्ट महिन्यापासून अदियाला तुरुंगात असून त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकरणातील अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी पीटीआयने यापुर्वी देखील देशव्यापी आंदोलन छेडले होते.
पीटीआय पक्षाने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा प्रस्ताव स्वीकारावा आणि त्यांच्याबरोबर चर्चा करावी. निवडणूक कायद्यातील दुरुस्तीबाबत पीटीआयने सरकारबरोबर वाटाघाटी कराव्यात, असे राणा सनाउल्लाहने पीटीआयच्या नेत्यांना सुचवले आहे. देशातील जनतेच्या हितासाठी हे आवश्यक आहे. देशाची आर्थिक स्थिती खराब असल्याने सर्वांसाठीच संकटाची स्थिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकार पीटीआयला ९ मे २०२३ सारखे किंवा २६ नोव्हेंबर २०२४ सारखे आंदोलन करू देणार नाही. गेल्यावर्षी पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी राजधानीवर मोर्चा काढला होता. मात्र आता तसे होऊ शकणार नाही, असे सनाउल्लाह म्हणाले.





