इस्लामाबाद, दि. 19 – दोन वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेली हवाई कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा निवडून देण्यास फायदेशीर व्हावी म्हणूनच करण्यात आली होती, अशा अर्थाच्या अर्णव गोस्वामी यांच्या मेसेजवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहेत. अर्णब गोस्वामी यांनी पार्थ दासगुप्ता यांना व्हाट्सऍपवर या अर्थाचा मेसेज केला असल्याचे उघड झाले आहे. यावरून इम्रान खान यांनी व्हाट्सऍपची मालकी असलेल्या ट्विटरकडे नाराजी व्यक्त केली आहे. हा मेसेज गोस्वामी यांनी संबंधित हल्ल्याच्या तीन दिवस अगोदरच केलेला होता. त्यामुळे त्यांना या हल्ल्याची माहिती अगोदरच कशी होती, अशी विचारणा इम्रान खान यांनी केली आहे. अर्णब गोस्वामी हे इंडियन रिपब्लिक टीव्हीचे सहप्रमुख आणि एडिटर इन चीफ आहेत. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. उघड झालेल्या व्हॉट्स ऍप चॅटमध्ये गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना 26 फेब्रुवारी 2019 च्या तीन दिवस अगोदर या हल्ल्याची कल्पना दिल्याचे उघड झाले आहे. गोस्वामी यांच्या मेसेजवर दासगुप्ता यांनी देखील अशा संभाव्य हल्ल्यामुळे मोदी यांना निवडणुकीत बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. या मेसेज देवाण-घेवाणीनंतर काही महिन्यांनी मे 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी यांना खरोखरच मोठे बहुमत मिळाले होते आणि हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली होती. मुंबई पोलिसांनी टीआरपी रेटिंग प्रकरणात पुरवणी आरोपपत्रामध्ये गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील मेसेज देवाण-घेवाणीचा उल्लेख केला आहे. यासंदर्भात दासगुप्ता किंवा गोस्वामी यापैकी कोणीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. गोस्वामी यांच्या विरोधात पाकिस्तान सरकार कारस्थान करत असल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती. या हल्ल्याची प्रतिक्रीया म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. निवडणुकांमध्ये विजय मिळण्यासाठीच मोदी यांनी हा हवाई हल्ला घडवून आणल्याचा आरोप इम्रान खान यांनी 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रात केलेल्या भाषणात केला होता. आता भारतीय पत्रकाराने या हल्ल्याच्या तीन दिवस अगोदरच तशी शक्यता व्यक्त केल्याचा मेसेज पुढे आल्यामुळे इम्रान खान यांनी भारताला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. गोस्वामी यांच्या मेसेज मुळे भारतातील विरोधकांनीही पंतप्रधान मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मेसेजची ही देवाणघेवाण राष्ट्रीय सुरक्षेला तेला धोकादायक आहे. भाजपकडून ही गोपनीय माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. टीव्हीच्या पत्रकारांना गोपनीय माहिती पुरवून राजकीय लाभ भाजपकडून उठवला जात असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही केला आहे.