तोडफोड प्रकरणी इम्रान यांच्यासह अन्य नेते निर्दोष

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या काही महत्वाच्या सहकारी नेत्यांना पाकिस्तानातील न्यायालयाने तोडफोडीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. इम्रान खान यांच्याबरोबर शाह मेहमूद कुरेशी आणि माजी मंत्री शेख रशिद यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले. न्यायालयाचा हा निकाल इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिलासा देणारा आहे.
तोडफोडीचे हे प्रकरण २०२२ मधील असून जमावबंदीचे आदेश असताना बेकायदेशीरपणे मोर्चा काढून तोडफोड केल्याचा या सर्वांवर आरोप होता. न्यायालयाने खान, कुरेशी आणि रशिद यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या सदाकत अब्बासी आणि अली नवाज अवान या दोन नेत्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे.
इम्रान खान यांना २०२२ च्या एप्रिल महिन्यात अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मोठी निदर्शने केली होती. त्या संदर्भात इम्रान खान आणि अन्य नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पक्षाने निषेध आंदोलन सुरू केले आणि मे २०२२ मध्ये एक मोठी रॅली काढली. त्याचे नेतृत्व खान यांनी केले होते आणि या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.
निदर्शक इस्लामाबादमध्ये दाखल होताच हिंसाचार झाला आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. या संदर्भात इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान आणि पीटीआयच्या वरिष्ठ नेत्यांसह १५० जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते.





