पुणे जिल्हा | शेती पंपाच्या विजेबाबत सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंचर महावितरण कार्यालयासमोर सोमवार, दि. १५ रोजी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शेती पंपाच्या वीज भारनियमनासंदर्भातील पंधरा दिवसात परिस्थिती सुधारली नाही. तर एक मेपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी यावेळी दिला आहे.
आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा, वाढलेले भारनियमन कमी करावे तसेच शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा या मागण्यासाठी वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर वरील मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मंचर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, धोंडीभाऊ भोर, गणेश यादव, दादाभाऊ थोरात,पूजा वळसे पाटील, संजय बढेकर,भरत मस्के, स्वप्निल बांगर,कुणाल बाणखेले, नवनाथ करंडे, बाबाजी इंदोरे, शंकर पिंगळे, मंगेश टेमकर ,दौलत भोर, बंडेश वाघ, विशाल वाबळे आदी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. देवदत्त निकम म्हणाले मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पूर्वकल्पना न देता शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. या संदर्भात पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. आम्ही निवेदन देऊन इशारा दिल्यानंतर काही प्रमाणात भारनियमन कमी झाले आहे.
हा शेतकरी एकजुटीचा निम्मा विजय आहे. मात्र शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. शेतीपूरक व्यवसायाला फटका बसला आहे. बळीराजा आता अन्याय सहन करणार नाही असे सांगून बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यात वीज मिळत नसल्याने पिके जळू लागली आहेत. सकाळी बारापर्यंत तरी वीज वितरण कंपनीने वीज द्यावी अशी मागणी दादाभाऊ थोरात यांनी केली. दादाभाऊ करंडे म्हणाले, मागील चार महिन्यापासून शेतीसाठी रात्री साडेदहा वाजता वीज येते व सकाळी पाच वाजता परत जाते.
अक्षरशा पिण्याच्या पाण्याची टाकी ही भरता येत नाही. सकाळी वीजपुरवठा झाला पाहिजे. हेमंत करंडे यांनी इमर्जन्सी लोड शेडिंग बंद करण्याची मागणी केली. शेतीसाठी रात्री वीज देणे ही चुकीची पद्धत आहे, असे मंगेश टेमकर म्हणाले.
अधिकाऱ्यांनी समजाऊन घेतल्या समस्या
दरम्यान वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व समस्या समजावून घेतल्या.त्यावेळी आपले म्हणणे वरिष्ठांच्या कानावर घातले जाईल, असे बांगर यांनी सांगितले.





