बिहारमधील भाजपच्या ‘स्ट्राईक रेट’मध्ये सुधारणा; इतर पक्षांची मात्र घसरण

पाटणा – बिहारची सत्ता राखण्यात एनडीएला मिळालेल्या यशामागे भाजपची मुसंडी कारणीभूत ठरली आहे. एकीकडे राजद आणि कॉंग्रेस या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा घसरलेला स्ट्राईक रेट, तर दुसरीकडे भाजपच्या स्ट्राईक रेटमध्ये झालेली सुधारणा एनडीएला पुन्हा सत्तेकडे घेऊन गेली.
बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत (2015) भाजप आणि जेडीयू या घटक पक्षांची फाटाफूट झाली. मागील वेळी भाजपने बिहारमधील विधानसभेच्या 243 पैकी 157 जागा लढवल्या. त्यावेळी भाजपला 53 जागांवर समाधान मानावे लागले.
त्यावेळचा भाजपने जिंकलेल्या जागांचे प्रमाण (स्ट्राईक रेट) 33.75 टक्के इतके होते. यावेळी जेडीयू, लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएचा घटक म्हणून भाजप निवडणुकीला सामोरा गेला. भाजपने यावेळी वाट्याला आलेल्या 110 पैकी 74 जागा पटकावल्या. त्यामुळे भाजपच्या यशाचा स्ट्राईक रेट सुमारे 68 टक्के इतका ठरला.
भाजपचा मित्रपक्ष जेडीयूच्या स्ट्राईक रेटमध्ये यावेळी लक्षणीय घसरण झाली. त्या पक्षाला 115 पैकी केवळ 43 जागांवर विजय मिळवता आला. यशाचे ते प्रमाण केवळ 37 टक्के ठरले. मागील वेळी जेडीयूने राजद आणि कॉंग्रेसशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी जेडीयूने 101 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मागील वेळी जेडीयूचा स्ट्राईक रेट 70 टक्क्यांच्या घरात होता.
विरोधकांच्या महाआघाडीचे प्रमुख घटक असणाऱ्या राजद आणि कॉंग्रेसच्या स्ट्राईक रेटमध्येही यावेळी मोठी घसरण झाली. यावेळी राजदने 144 पैकी 75 जागा जिंकल्या. त्या पक्षाच्या यशाचे प्रमाण 52 टक्के इतके आहे. मागील वेळी राजदने 101 पैकी 80 जागा खिशात घातल्या होत्या. त्यावेळी राजदचा स्ट्राईक रेट 79 टक्क्यांपेक्षा अधिक होता.
मागील वेळी कॉंग्रेसने केवळ 41 जागा लढवून तब्बल 27 जागा पटकावल्या होत्या. तर यावेळी 70 जागा लढवूनही कॉंग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कॉंग्रेसचा स्ट्राईक रेट सुमारे 66 टक्क्यांवरून घसरून 27 टक्के इतका झाला.





