Chandrasekhar Bawankule : एकनाथ शिंदे महायुतीचे महत्वाचे घटक : चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रगल्भ आणि महायुतीतील महत्त्वाचे घटक आहेत अशी प्रतिक्रिया शिंदे यांच्या कथित नाराजीच्या बातम्यांसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतायत. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. विरोधकांना नामोहरम करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केले आहे.
हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आता राजकारण नको लोकांना जी आश्वासने दिली ती पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे देखील अडचणीत आले आहे.
त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. दुसरीकडे या मागणीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील, असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लक्ष घर मंजूर झाली आहेत. 20 लाख घरांचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांना आज चेकचे वितरण केले जाईल, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दोन पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील, असेही ते म्हणाले.





