अमेरिका कार, औषधांवर आयात शुल्क लावणार; भारतीय उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता

वॉशिंग्टन – आपण पुढील महिन्यात किंवा त्या अगोदर आणखी काही वस्तूवर आयात शुल्क लावण्याची घोषणा करणार आहोत. त्यामध्ये लाकूड, वाहन, वाहनाची सुट्टे भाग, सेमीकंडक्टर आणि औषधांचा समावेश असेल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.
भारत अमेरिकेला वाहनाचे सुटे भाग, औषधी मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्यामुळे याचा भारतीय उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे भारत – अमेरिका व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी चालू असतानाच भारत ज्या वस्तूची अमेरिकेला निर्यात करतो त्या वस्तूवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ट्रम्प संसदेला फारसे विचारात न घेता कार्यकारी आदेश काढून विविध देशांविरोधात आयात शुल्काचा मार्ग अवलंबित आहेत. अमेरिका जशास तसे या समीकरणांनुसार जे देश अमेरिकेच्या वस्तू आयात शुल्क लावतात त्या देशाच्या वस्तूवर अमेरिका आयात शुल्क लावणार असल्याचे ट्रम्प यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. आज ट्रम्प यांनी केलेल्या घोषणाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला.
जपान आणि जर्मनीतून नकारात्मक प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल जर्मनीच्या वाहन उद्योगाने नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांची घोषणा चिथावणीखोर असल्याचे सांगण्यात आले. युरोपियन समुदायाला अमेरिकेबरोबर या विषयावर चर्चा करण्याची सूचना करण्यात आली. जर्मनीच्या एकूण कार उत्पादनापैकी 13 टक्के कार अमेरिकेला निर्यात होतात. जर 25% आयात शुल्क लावले तर या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आयात शुल्काचा उपयोग व्यापारी युद्धासाठी करणे बरोबर होणार नाही.
जर्मनीत अगोदरच वाहन उद्योगात मंदी असताना अमेरिकेच्या या निर्णयामुळे जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान ट्रम्प यांच्याबद्दल जपान मधील कंपन्यांनी नकारात्मक भावना व्यक्त केली आहे. जपान मधील 90% कंपन्यांनी ट्रम्प हे जागतिक व्यापारासाठी धोकादायक वर्तणूक करीत असल्याचे म्हटले आहे.





