पडसाद : एमपीएससीवरील विश्वासाला तडा
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील ढासळता विश्वास आणि निष्पक्ष व पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची गरज या मुद्द्यांचा ऊहापोह...

– डॉ. विवेक बी. कोरडे
MPSC : औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील ढासळता विश्वास आणि निष्पक्ष व पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची गरज या मुद्द्यांचा ऊहापोह…
पेपरफुटीच्या घटनांचा (MPSC) विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या मेहनतीवर आणि संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. एमपीएससीसारख्या संस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत. कारण एमपीएससीवरील विश्वासाला तडा गेला असेल तर प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाही.
महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी एमपीएससी ही केवळ एक परीक्षा घेणारी संस्था नाही ती त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा जुगार आहे, ज्यात ते स्वतःची तरुणाई पणाला लावतात. कोवळी वर्षे, कुटुंबाचा घाम, उधार घेतलेले पैसे, सोडून दिलेली नोकरीची संधी हे सगळं एका विश्वासावर उभं असतं- ‘प्रामाणिकपणे झटलो, तर न्याय मिळेल.’ आज हाच विश्वास कुणीतरी छिन्नविच्छिन्न करून टाकला आहे.
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी ही केवळ एक घटना नाही हा एक विश्वासघात आहे. हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीत खुपसलेला सुरा आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच ठराविक लोकांच्या हातात पोहोचली, काहींनी जाणीवपूर्वक चुकीची उत्तरं देत संशयाचं जाळं चुकवलं, हे आरोप जर खरे ठरले, तर हा केवळ गैरप्रकार नाही, ही एका पूर्ण पिढीच्या स्वप्नांची हत्या आहे. रात्र रात्र जागून, डोळ्यांखाली काळी वर्तुळं घेऊन अभ्यास करणार्या मुला-मुलींच्या चेहर्यावर ही घटना चपराक मारते आणि विचारते ‘कशाला जीव जाळलास? इथे पैसा आणि ओळखच चालते.’
स्पर्धा परीक्षा ही समान संधीची पवित्र चौकट असते. पण जेव्हा त्या चौकटीलाच आतून कीड लागते, तेव्हा ही परीक्षा राहातच नाही ती एक भोंदू, विकाऊ खेळ बनते, जिथे गुणवत्तेचा गळा घोटून पैसा आणि वशिला जिंकतो. जो विद्यार्थी अशा परीक्षेत हरतो, तो केवळ एक पेपर हरत नाही त्याच्या मनात कायमचं एक विष पेरलं जातं- मेहनत ही मूर्खांची गोष्ट आहे. हे विष एका पिढीला उद्ध्वस्त करू शकतं आणि हीच खरी शोकांतिका आहे.
आणखी संतापजनक बाब म्हणजे या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट आयोगाच्या गोपनीय गाभ्यापर्यंत पोहोचल्याचे आरोप आहेत. म्हणजे ज्या तिजोरीत विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित असायला हवं होतं, तिथेच चोर घुसले! ही साधी सुरक्षा-त्रुटी नाही ही व्यवस्थेच्या गाभ्यातच बसलेली सडलेली मानसिकता आहे आणि जोपर्यंत या साखळीतील प्रत्येक हात, प्रत्येक सही, प्रत्येक टप्पा चव्हाट्यावर येत नाही, तोपर्यंत ही आग विझणार नाही, विझूही नये.
पेपरफुटी झाली की एक ठरलेला फार्स रंगतो- आरोप, चौकशीचे नाटक, दोन-चार बळीचे बकरे, परीक्षा रद्द आणि पुनर्परीक्षा घेऊ, असं गोंडस आश्वासन. पण या नाटकात कुणी विचारतंय का की, ज्या मुलाने वयाची शेवटची संधी या परीक्षेत (MPSC) झोकली, त्याचं काय? ज्या मुलीने घरच्यांकडून कर्ज काढून क्लास लावला, तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यातल्या पाण्याचं काय? गेलेला वेळ, गेलेला पैसा, गेलेली संधी हे कुणी परत देणार आहे का? पुनर्परीक्षा हे उत्तर नाही, ती जखमेवर फक्त बँडेज आहे. आतला ठणका तसाच धगधगत राहतो.
म्हणूनच पुण्याच्या रस्त्यावर उतरलेला तरुणांचा जमाव हा साधा निषेध नव्हता तो वर्षानुवर्षांच्या साचलेल्या संतापाचा उद्रेक होता, एक चित्कार होता. ‘त्यांचा पेपर होता, आमची स्वप्नं होती’ या एका वाक्यात हजारो तुटलेल्या स्वप्नांची किंकाळी दडलेली आहे. या मुलांना गोंडस आश्वासने नकोत, यांना डोकं चालवणार्या राजकीय बडबडीचाही ऊबग आलाय. यांना फक्त एकच हवंय या व्यवस्थेने विकाऊ न होण्याची शाश्वती.
ही घटना ‘माझ्या आधीच्या काळातली’ आहे असं सांगून जबाबदारी झटकणं हे तर आणखी संतापजनक आहे. खुर्ची कुणाचीही असो, बुडणारी विश्वासार्हता ही आयोगाचीच आहे. एका माणसाच्या राजीनाम्याने किंवा बदलीने ही किड मरणार नाही. कारण, किड व्यक्तीत नाही, व्यवस्थेत आहे. प्रश्नपत्रिका तयार होण्यापासून ती केंद्रावर पोहोचेपर्यंतची संपूर्ण साखळी आज संशयाच्या भोवर्यात आहे आणि ती पूर्णतः उखडून टाकल्याशिवाय पर्याय नाही.
आज विद्यार्थ्यांना गोंडस भाषणं नकोत. त्यांना एवढंच हवंय- रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना, कुणीतरी पैशाच्या किंवा ओळखीच्या जोरावर त्यांच्या मेहनतीवर डल्ला मारणार नाही, याची खात्री आणि जर कुणी हा विश्वासघात केलाच, तर तो कुणाच्याही दबावाखाली दडपला जाणार नाही, ही हमी. कारण, परीक्षा व्यवस्थेचा पाया विश्वास आहे आणि एकदा तो उद्ध्वस्त झाला की, कितीही नियम बनवा, कितीही तंत्रज्ञान आणा, तो सहजासहजी परत उभा राहात नाही. आज एमपीएससीसमोर एका परीक्षेचं संकट नाही तिच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे.
दोषींना फक्त शिक्षा पुरेशी नाही; संपूर्ण साखळी उघड्यावर आणून, ती मुळापासून उखडून टाकावी लागेल. अन्यथा उद्या आणखी एक पिढी रस्त्यावर उतरेल आणि विचारेल, ‘आमची स्वप्नं विकायला कुणी परवानगी दिली?’ ओंकारेश्वरपासून जिल्हाधिकारी (MPSC) कार्यालयापर्यंत घोषणा देणारी ही तरुणाई एकच प्रश्न विचारतेय ‘आम्ही जीव तोडून मेहनत करतोय; व्यवस्था तरी प्रामाणिक राहणार आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर टाळाटाळ करून मिळणार नाही. कारण, जर गैरप्रकार मेहनतीपेक्षा मोठा ठरू लागला, तर तो पराभव एका विद्यार्थ्याचा नसतो तो या संपूर्ण व्यवस्थेच्या आत्म्याचा खून असतो.






