जीएसटी कपातीचा परिणाम: ऑक्टोबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेत मोठी वाढ

नवी दिल्ली – जीएसटी दरात कपात केल्यानंतर वस्तूंची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता ऑक्टोबर महिन्यात वाढली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. निर्यातीवर मात्र काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
ऑक्टोबर महिन्यातील पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय वाढून 59.2 इतका नोंदला गेला आहे. सप्टेंबर महिन्यात हा निर्देशांक 57.7 इतका होता. हा निर्देशांक 50 अंकावर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. तर हा निर्देशांक 50 अंकापेक्षा कमी असल्यानंतर हे क्षेत्र आंकुचन पावत असल्याचे समजले जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा निर्देशांक 50 अंकाच्यावर आहे.
गेल्या महिन्यांमध्ये या निर्देशांकात थोडीफार घसरण झाली होती. आता या क्षेत्राला पुन्हा उभारी आली असल्याचे वातावरण आहे. कंपन्यातील ऑर्डर वाढण्याबरोबरच रोजगार निर्मितीही वाढत असल्याचे दिसून येते असे हा निर्देशांक तयार करणार्या एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ञ प्रांजूल भंडारी यांनी सांगितले.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये विक्री वाढल्यामुळे कंपन्याकडील इनव्हेंटरी आता कमी झाली आहे. ती वाढविण्यासाठी कंपन्या कच्च्या मालाची खरेदी करीत आहेत. तसेच काही प्रमाणात मनुष्यबळ कामावर ठेवत आहेत. कच्च्या मालाच्या दरात माफक वाढ झाली आहे. तरीही याचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेवर फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही. या क्षेत्रातील रोजगार निर्मिती सलग बाराव्या महिन्यात वाढली आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील वाढलेल्या उत्पादकतेचे श्रेय विश्लेषकांनी जीएसटीच्या सुधारणांना दिले आहे. कंपन्यांचा कर भरण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे. मागणी वाढल्यामुळे विक्री वाढत आहे. मुळात या कराचा आणखी एक टप्पा नजीकच्या भविष्यात कमी करण्याच्या शक्यतेवर सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.





