Manufacturing Sector: मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उमेद परतली; जानेवारीत औद्योगिक उत्पादनवाढ 5 टक्क्यांवर

नवी दिल्ली – किरकोळ महागाई चार टक्क्यांपेक्षा कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली असतानाच औद्योगिक उत्पादन जानेवारी महिन्यात पाच टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व बँक व्याजदरात कपात करीत असल्यामुळे या क्षेत्रातील उत्पादकता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देश -विदेशात व्यापार युद्ध चालू असतानाच औद्योगिक उत्पादन वाढीमुळे सरकार सुखावले आहे.
डिसेंबर 2024 मध्ये औद्योगिक उत्पादन 3.5 टक्क्यांनी वाढले होते. औद्योगिक उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार बर्याच दिवसापासून प्रयत्न करत होते. मात्र प्रयत्नांना यश मिळत नव्हते. मात्र आता या क्षेत्रात उमेद निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन 4.2 टक्क्यांनी वाढले होते. म्हणजे वार्षिक पातळीवर औद्योगिक उत्पादनात समाधानकारक वाढ झाली आहे.
जानेवारीत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकतात तब्बल 5.5 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ही उत्पादकता 3.6 टक्क्यांनी वाढली होती. मात्र खाण क्षेत्राची उत्पादकता 4.4% इतकी नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी ही उत्पादकता सहा टक्के इतकी होती. वीज उत्पादनही कमी होऊन 2.4 टक्के झाले आहे. जे की गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 5.6% होते. भांडवली वस्तू क्षेत्राची उत्पादकता जानेवारीत 7.8% नोंदले गेली आहे. जी की गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 3.2 टक्के होती. ग्राहक वस्तू क्षेत्राची उत्पादकता जानेवारी महिन्यात 7.2 टक्क्यांनी वाढली आहे.
एप्रिल ते जानेवारी 2024 दरम्यान औद्योगिक उत्पादन सहा टक्क्यांनी वाढले होते. या वर्षी एप्रिल ते जानेवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 4.2% वाढले आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनही सुधारण्यास वाव आहे. रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे मागणी वाढून औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत होईल असे समजले जात आहे.





