जागतिक व्यापार युद्धाचा परिणाम; निर्यातदारांना मदतीचा दिलासा देण्याची सरकारची तयारी

नवी दिल्ली – जागतिक व्यापार युद्धामुळे देशातील निर्यात दारावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत या निर्यातदारांना आवश्यक ती मदत करण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. विशेषतः कपडे आणि रसायन क्षेत्रातील निर्यातदारांना ही मदत करण्यात येईल असे समजले जाते.
वाणिज्य मंत्रालयातील अधिकार्यांनी या अगोदरच अन्नप्रक्रिया, पोलाद, इंजीनियरिंग, समुद्रि खाद्य, कृषी क्षेत्रातील निर्यातदारांबरोबर चर्चा केली आहे. त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, या संदर्भात माहिती घेतली आहे.
अमेरिकेसोबत होणार्या निर्यातीची तूट भरून काढण्यासाठी गुंतवणूकदारांना इतर बाजारपेठात निर्यात वाढवावी लागणार आहे. यासाठी या निर्यातदारांनी कमी व्याजदरावर कर्जाची अपेक्षा सरकारकडून केली आहे. अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम होऊ नये यासाठी इतर देशाच्या मार्गे ही निर्यात करण्याऐवजी थेट अमेरिकेला माल पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.





