देशातून ‘हे’ चार प्रमुख कायदे होणार हद्दपार? ; गृहमंत्री अमित शहा यांनी केली तयारी पूर्ण

Immigration and Foreigners Bill 2025 । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ सादर करणार आहेत. ज्याच्या अंमलबजावणीनंतर भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या विधेयकाचे कायदयात रूपांतर झाल्यानंतर, इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांशी संबंधित चार जुने कायदे रद्द केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठीचा सर्व आराखडा तयार करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.
या नवीन विधेयकात, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देऊन, परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबाबत आणि त्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत कठोर नियम करण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे देशात राहणे देशासाठी धोका निर्माण करत असेल किंवा त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे भारतीय नागरिकत्व मिळवले असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच, जर कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशामुळे भारताचे इतर कोणत्याही देशाशी असलेले संबंध बिघडत असतील तर त्याला देशात प्रवेश दिला जाणार नाही.
‘हे’ चार जुने कायदे रद्द होणार Immigration and Foreigners Bill 2025 ।
या विधेयकानुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला जाईल. जरी पूर्वी देखील अधिकाऱ्याला परदेशी लोकांना भारतात येण्यापासून रोखण्याचा अधिकार होता, परंतु कायद्यात ते स्पष्ट नव्हते. आता हे लेखी कायद्यात असेल. इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ कायदा झाल्यानंतर, भारतातील चार जुने कायदे रद्द केले जातील. यामध्ये परदेशी कायदा १९४६, पासपोर्ट कायदा १९२०, परदेशी नोंदणी कायदा १९३९ आणि इमिग्रेशन कायदा २००० यांचा समावेश आहे.
बनावट पासपोर्ट घेऊन भारतात प्रवेश केल्यास काय शिक्षा होईल?
या विधेयकात वेगवेगळ्या परिस्थिती आणि त्यांना लागू असलेल्या शिक्षेचाही उल्लेख आहे. जर एखादी व्यक्ती वैध पासपोर्टशिवाय किंवा बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीने बनावट पासपोर्ट मिळवला असेल आणि नंतर भारतात प्रवेश केला असेल तर त्याला २ ते ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये, १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
व्हिसा संपल्यानंतरही राहणाऱ्यांना किती दंड आहे? Immigration and Foreigners Bill 2025 ।
या विधेयकानुसार, जर परदेशी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात बेकायदेशीरपणे राहिले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणात, त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तीन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.





