नेवासा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करा: ॲड. सुभाष लांडे

नेवासा : ग्रामीण जीवन समृद्ध करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केले. जनकल्याण फाउंडेशन, गोंडेगाव यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पाडळे होते. यावेळी कॉम्रेड बाबा आरगडे, सुनील गोसावी, ॲड. बन्सी सातपुते, शाहीर भारत गाडेकर, प्रा. डॉ. अशोक कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
लांडे म्हणाले, “मतांच्या राजकारणामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे. अशा कार्यक्रमांमधून गावचे गावपण टिकवले जाते.” जनकल्याण फाउंडेशनचे समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात पाडळे यांनी ग्रामीण भागात अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. प्रा. डॉ. अशोक कानडे यांनी प्रास्ताविक, तर सुनील गोसावी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रज्याक शेख आणि डॉ. संतोष तागड यांनी केले.
सामाजिक कार्यासाठी अविनाश घुले, पत्रकारितेसाठी अविनाश मंत्री, साहित्यासाठी प्रकाश खंडागळे, आरोग्यासाठी ज्योती तोडमल, कृषीसाठी प्रवीण रोकडे आणि कलाक्षेत्रासाठी किरण बेरड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कवी सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलनात चंद्रकांत कर्डक, गीताराम नरवडे यांच्यासह अनेकांनी कविता सादर केल्या. शाहीर भारत गाडेकर यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमात रंगत आली.





