‘मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नाही, त्यांना धन्यवाद देतो…’; ‘धर्मवीर 2’च्या टीझरमधील ‘त्या’ चुकीबद्दल मंगेश देसाई काय म्हणाले? पाहा….

Dharmaveer 2 | Teaser | Anand Dighe । Mangesh Desai : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांनी या टीझरला चांगली पसंती दिली आहे.
मात्र, या टीझरमधील एक गोष्ट काहींना खटकली आहे. त्यामुळे चित्रपटाला फटका बसणार का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये एक मुस्लिम महिला दिघे साहेबांकडे राखी बांधायला येते. साहेब तिला बुरखा काढायला सांगतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं साहेबांना कळतं आणि साहेब संतापतात.
राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन साहेब निघतात. महिलांना घेऊन जेव्हा आनंद दीघे निघतात, तेव्हा बाजूने लोकल जाताना दाखवली आहे. ही लोकल दिघे साहेबांच्या काळातली नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘दिघे साहेबांच्या काळात ही लोकल ट्रेन नव्हती जी बॅकग्राऊंडमध्ये दाखवली आहे.
त्याऐवजी मालगाडी जाताना दाखवली असती तर बरं झालं असतं. ते व्हिएफएक्सने सहज शक्य होतं. अशी कमेंट एका युजरने केली आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणून दिली. यावरून प्रेक्षक किती बारकाईने कलाकृतीकडे बघतात हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
दरम्यान, यावर आता स्वतः चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुखातील मंगेश देसाई यांना याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी 3 तारखेला टिझर पहिला असताना मला यामध्ये अनेक गोष्टी राहिल्या असल्याचं सांगितलं. पण मीच माझ्या टीमच्या मागे लागून हा टिझर तयार करून घेतला. मी टीमला सांगितलं मला करायचंच आहे.
मला हा टिझर 7 तारखेला तयार करून पाहिजेच, आणि यामध्ये ही गोष्ट राहून गेली. उलट मी आपल्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो, की तुम्ही ही चूक मला दाखवून दिली. पण यानिमित्ताने मला एक गोष्ट कळाली मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे आणि जाणकार आहे. आजकाल मराठी प्रेक्षक कोणताही सिनेमा पहिला जात नाही, त्यांचं बारीक लक्ष आहे.
उलट मी नेटकऱ्यांवर अजिबात नाराज नसून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यानंतर माझ्या टीमला सांगितलं अरे ! एवढी मोठी गोष्ट तुमच्या लक्ष्यात कशी नाही आली. त्यांनी देखील माझी माफी मागितली आणि ते मला बोले की दादा जेव्हा सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा सर्व गोष्टी सुधारलेल्या असतील’. असं देखील मंगेश देसाई यावेळी म्हणाले.





