Nagar | बेकायदेशीर पद्धतीने तंटामुक्त अध्यक्षांची निवड

नेवासा, (प्रतिनिधी) – बेकायदेशीर पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनाने पाचेगाव येथे तंटामुक्त अध्यक्षांची निवड केली. ही निवड करताना ग्रामस्थांना अगोदर कुठलीही कल्पना न देता अचानक ग्रामसभेत विषय घेऊन संबंधित व्यक्तीला विरोध होत असतानाही निवड करून घेतली.
ही निवड ग्रामसभेत जाहीर न करता ग्रामपंचायतमध्ये येऊन जाहीर केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या हुकूमशाही पद्धतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.१९) सकाळी १० वाजेपासून ग्रामपंचायतसमोर उपोषण सुरू केले आहे.
विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने यापूर्वी या पदावर काम केलेले आहे. त्याच व्यक्तीच्या काळात गावातील अनेक गुन्ह्यांची पोलीस प्रशासनात नोंद झालेली आहे.
पद, जबाबदारी सांभाळण्यात संबंधित व्यक्तीला सपशेल अपयश आलेले असताना देखील सरपंचाच्या पार्टीचा हा संबंधित व्यक्ती आहे, म्हणून एकांगी भूमिकेतून त्याची निवड घडवून आणली, असा उपोषणकर्त्यांचाआरोप आहे.
आत्तापर्यंत ग्रामपंचायत प्रशासन सर्व गोष्टी स्क्रिप्टेड(अगोदर ठरवून) पद्धतीने करतात. गावासमोर येऊन फक्त जाहीर करतात, असा आरोप करत अनेकांनी पाचेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण पुकारले आहे.
ग्रामपंचायतने आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेल्या अनेक पत्रांवर जावक क्रमांकच नाहीत, यावरून काहीतरी बेकायदेशीर पद्धतीने किंवा संशयित पद्धतीने होत असल्याचा आरोपही उपोषणार्थींनी केला आहे.
हुकूमशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही, अन्यथा आत्मक्लेश करू परंतु सामान्यांना न्याय मिळवून दे, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





