सोनई, (वार्ताहर) – तालुक्यातील रांजणगाव देवी व सौंदाळा परिसरात अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याचे काम खाण मालकाकडून रात्रंदिवस सुरू आहे. मात्र, तालुका प्रशासनाचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष दिसून येते. या खाणमालकांना महसूल यंत्रणेचा छुपा आशीर्वाद आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रात्रंदिवस काम सुरू असून, तेथील रहिवाशांना ब्लास्टिंगचा आवाज येत असल्याने त्यांचे तिथे राहणे मुश्किल झाले आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांना त्याचे काही देणे घेणे नाही. या खाण मालकावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रात्रंदिवस येथे हे उद्योग चालत असताना अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का, असा सवाल येथील रहिवाशांमधून उपस्थित केला जात आहे. येथील खाणीमध्ये 50 ते 100 फूट बोअरवेलने बोर घेऊ त्यामध्ये उच्च दर्जाचे काडतुसे वापरून ब्लास्टिंग केले जाते. त्या ब्लास्टिंगमुळे खाणी शेजारील घरांना तडे जात असल्याने तेथील रहिवासी प्रचंड भीतीच्या दडपणाखाली जीवन जगत आहेत.त्याचबरोबर कूपनलिका आणि विहिरीची पाण्याची पातळी कमी होत आहे. ब्लास्टिंगच्या हादऱ्याने बोअरवेलमधील मोटर खाली जाणे असे प्रकार वारंवार घडत आहे. रात्रंदिवस हे काम चालू असल्याने ब्लास्टिंगच्या आवाजाने झोपेचा त्रास होणे तसेच कायम असले प्रकार सुरू असल्याने येथील रहिवासी रामकिसन आरगडे यांनी रोजच्या त्रासाला कंटाळून प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लहान मुलांना त्या ठिकाणी राहणे असाह्य झाले आहे. या परिसरातील नागरिक नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषणाच्या तयारीत असल्याचे समजते.