Gas cylinder shortage – शहरातील एलपीजीच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने १८ एप्रिल रोजी राबविलेल्या विशेष धाड मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजीचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत चेंबुर आणि अनुशक्तीनगर (देवनार) परिसरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार पथकाने ही कारवाई केली. एलपीजी गॅसचा काळाबाजार व अनियमितता रोखण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. चेंबूर परिसरातील पेस्तमसागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान एकूण ८ एलपीजी सिलेंडर्स विनाबिल अवैधरित्या वापरत असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे २५,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिळकनगर (चेंबूर) पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. येथे एकूण १९ एलपीजी सिलेंडर अवैध वापरात असल्याचे आढळून आले. सुमारे ४९,११७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरी पुरवठा विभागाकडून एलपीजी गॅसच्या बेकायदेशीर साठवणूक व वापराविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.