illegal liquor raid: खळबळजनक! ट्रॅक्टर आणून उकरली जमीन अन्…; माण तालुक्यात हातभट्टीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त
illegal liquor raid: राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची संयुक्त धडक कारवाई; २,७२५ लिटर रसायनासह मुद्देमाल जप्त.

illegal liquor raid – माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त धडक कारवाई करत मोठे हातभट्टी निर्मिती केंद्र उद्ध्वस्त केले. या कारवाईत तब्बल २,७२५ लिटर रसायनासह एकूण १ लाख १३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत गुरुवारी (दि. ११) वरकुटे मलवडी येथे मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते १३ जूनदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वरकुटे मलवडी परिसरातील अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापा टाकला. कारवाईदरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन जमिनीत पुरून ठेवण्यात आल्याचे आढळले. पथकाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीतून दहा लोखंडी पत्र्याचे बॅरल बाहेर काढले.
त्यामध्ये साठवून ठेवलेले एकूण २,७२५ लिटर रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख १३ हजार ५० रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण, उपनिरीक्षक अजयकुमार पाटील यांच्यासह उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध मार्गाने तयार करण्यात येणारी हातभट्टी दारु, बनावट ताडी किंवा इतर मद्यप्रकार हे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अशा मद्याच्या सेवनामुळे अनेकदा दुर्दैवी घटना घडत असल्याने नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्यापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





