Shirur News : शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जांबूत : शिरूर तालुक्यासह बेट भागात दिवसेंदिवस अवैध धंद्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, हे धंदे आता स्थानिक नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत. अनेक ढाबे आणि हॉटेल्समध्ये बिनधास्तपणे विनापरवाना दारू विक्री केली जात आहे. तसेच काही ठिकाणी मटका आणि जुगाराचे मोठे डावही उघडपणे खेळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विशेषतः १८ ते ३० वयोगटातील युवक या अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकत असून, व्यसनांच्या आहारी जात आहेत. काही ठिकाणी तर हजारो रुपयांचे मटका व जुगार डाव चालू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर थेट पुणे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करू, असा इशारा दिला आहे. याआधी देखील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. संबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळल्यास त्या ठाण्याच्या प्रमुखावर थेट कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यासंदर्भात वृत्तपत्रांतूनही वार्तांकन झाले असून, अनेक गावांतील महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरूच आहे. पोलीस प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने ढाबा चालक आणि पोलीस यांच्यात अर्थपूर्ण संबंध आहेत का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
तरुण पिढीचा विनाश – प्रशासनाची दुर्लक्षी भूमिका
या सर्व प्रकारांकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. महिलांनी अनेकदा रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला, मात्र त्यावेळी केवळ तात्पुरती कारवाई होते आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. यामागचे नेमके गूढ काय आहे, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
मटका, जुगार आणि बेधुंद दारूविक्रीमुळे तरुण पिढी वाया जात असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.





