IISER: उमर खालिद यांचे पुस्तक आयसरने हटविले
IISER:

IISER: – समाजमाध्यमांवर झालेल्या टीकेनंतर पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या संशोधनावर आधारित पुस्तक ग्रंथालयातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुस्तक समावेशाच्या अवघ्या ४८ तासांत घेतलेल्या या निर्णयामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शैक्षणिक संस्थांच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आयसरच्या श्रीनिवास रामानुजन ग्रंथालयात शनिवारी नव्याने दाखल झालेल्या पुस्तकांमध्ये फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज : आदिवासी हिस्टरीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर या पुस्तकाचा समावेश होता.
ग्रंथालयाच्या डिजिटल स्क्रीनवरील पुस्तकाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याबद्दल टीका झाली. संबंधित पुस्तकाबाबत अधिकाऱ्यांना माहिती मिळताच गैरसमज किंवा अशांतता टाळण्यासाठी ते मागे घेण्यात आले असून, पुढे कोणती उपाययोजना करता येईल, याची तपासणी करणार असल्याचेही आयसरने स्पष्ट केले. जगरनॉट प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक खालिद यांच्या जेएनयूतील पीएचडी प्रबंधावर आधारित आहे.





