B. M. Shaikh : राष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड प्रशिक्षणासाठी शिक्षक बी. एम. शेख यांची निवड
देशभरातील हुशार विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ घडवणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत इगतपुरीच्या एका शिक्षकाने (B. M. Shaikh) बाजी मारली आहे.

B. M. Shaikh : देशभरातील हुशार विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ घडवणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड परीक्षेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत इगतपुरीच्या एका शिक्षकाने (B. M. Shaikh) बाजी मारली आहे.
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज’चे जीवशास्त्र विषयाचे शिक्षक बी. एम. शेख (B. M. Shaikh) यांची मुंबईत आयोजित उच्चस्तरीय विशेष निवासी प्रशिक्षणासाठी निवड झाली असून त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. देशभरातील ३० राज्यांमधून निवडल्या गेलेल्या मोजक्या तज्ज्ञ शिक्षकांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान शेख सरांना मिळाला आहे.
भारत सर्व सेवा संघ (पाचेगाव) संचलित न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक बी. एम. शेख (B. M. Shaikh) यांनी ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान मुंबईतील अणुशक्ती नगर येथील प्रतिष्ठित ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’ (HBCSE) येथे पार पडलेल्या पाच दिवसीय निवासी कार्यशाळेत सहभाग घेतला.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) अंतर्गत राबवण्यात आलेल्या या राष्ट्रीय उपक्रमासाठी संपूर्ण देशभरातून पेशी जीवशास्त्र (Cell Biology) आणि आण्विक जीवशास्त्र (Molecular Biology) या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व प्रभुत्व असलेल्या निवडक शिक्षकांचीच चाळणी करून निवड करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील एका शिक्षकाची राष्ट्रीय स्तरावर झालेली ही निवड शिक्षण क्षेत्रात कौतुकाचा विषय ठरली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड आणि आधुनिक प्रायोगिक कौशल्ये रुजवून त्यांना ऑलिम्पियाडसारख्या जागतिक स्पर्धांसाठी सक्षम करणे, हा या विशेष शिबिराचा मुख्य हेतू होता. या पाच दिवसांत सहभागी शिक्षकांना प्रगत प्रायोगिक तंत्रज्ञान, प्रयोगशाळेतील अद्ययावत साधने तसेच जीवशास्त्रातील नवनवीन संशोधन पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमात विविध आयआयटींमधील नामवंत शास्त्रज्ञांसह होमी भाभा सेंटरच्या प्राध्यापिका अनुपमा, रेखा वर्तक, मयुरी रेड्डी आणि ऑल इंडिया बायोलॉजिकल सायन्स असोसिएशनचे सरचिटणीस शिवकुमार मेनन आदी दिग्गजांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाबाबत कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षक बी. एम. शेख म्हणाले, “या राष्ट्रीय स्तरावरील निवासी कार्यशाळेमुळे जीवशास्त्र विषयातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रायोगिक ज्ञानाचे नवे पैलू समजून घेता आले. हे अद्ययावत ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात विज्ञानाची गोडी आणि संशोधनाची वृत्ती निर्माण करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरेल.”
दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर शाळेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नळगे, सचिव प्रकाश जाधव, शाळा समिती अध्यक्ष डॉ. अशोकजी तुवर, प्राचार्य एस. एच. पाटील, उपप्राचार्य ए. डी. म्हस्के यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बी. एम. शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा (B. M. Shaikh) दिल्या आहेत.






