राष्ट्रवादीला बारामतीतून, काँग्रेसला साकोलीतून पराभूत करायचं, तर वरळीतील पाणी घेऊन मशाल विझवायची ?

मुंबई – देशात अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. गड कोणाच्या एकाच्या मालकीचा राहत नाही, हा देशाचा इतिहास आहे. शरद पवारांचा गड 2024 ला भाजपाने जिंकलेला दिसेल. असे भाकित गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केले होते. आता पुन्हा एकदा बावनकुळे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्ष जिंकणार असल्याच्या विश्वास व्यक्त केला आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलतांना बावनकुळे म्हणाले,’ महाविकास आघाडीचे प्रचंड वाईट हाल होणार आहेत. घडी बारामतीतून बंद करायची. पंजा साकोलीतून थांबवायचा. साकोली हा नाना पटोलेंचा मतदारसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाच्या मतदारसंघातून पंजा थांबवायचा. मशालला वरळीतून थांबवायची आहे. वरळीतील पाणी घेऊन मशाल विझवायची आहे’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात भाजपा रणनीती आखत आहे. त्याच बरोबर या निवडणुकीत महाविकास आघाडीचा कोणत्याही परिस्थितीत पराभव घडवून आणण्याचा चंगच बावनकुळे यांनी बांधला आहे.





