Manoj Jarange : जास्त बोलले तर…; जरांगेंचा मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावरील त्यांच्या आमरण उपोषणाचा आजच तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलनकांची संख्या वाढलेली आहे. राज्याच्या कानाकोऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे.
या सगळ्यात भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांने मराठा आरक्षणासंदर्भात एक विधान केलं आहे. जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला? असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. सांगलीमध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या टीकाला मनोज जरांगेंनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
जरांगेंच तिखट शब्दांत प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटील यांना सांगा, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून आम्ही चांगलं बोललो. पण आता वचवच करू नये. त्यांना काय अक्कल आहे? त्यामुळेच त्यांना काढून टाकलं आहे, अशा तिखट शब्दांत जरांगेंनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पडताळणी रोखली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पुढं ते म्हणाले कोल्हापूर म्हणजे आमच्याच राजघराण्याच्या कचाट्यात ते राहातात. जास्त बोलू नये. शांत राहावे. जास्त बोलले तर, त्यांचा गेम वाजवला म्हणून समजा, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यावहारिक मागण्या कराव्यात. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत, त्यासाठी ते आंदोलनास बसले आहेत. व्यवहारिक मागण्या कराव्यात सरकार त्या मान्य करेल. पुढं पाटील म्हणाले, त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाखांची नुकसानभरपाई तसेच वारसांना शासकीय नोकरीत घेतले आहे. फक्त यातून 9 जणांना वगळण्यात आले, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बैठकांचा सिलसिला अन् हालचालींना वेग
आज ३१ अॅागस्ट आंदोलनाचा तिसरा दिवस असून उद्यापासून पाणीही घेणार नसल्याची मोठी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होणार आहे. मुंबईतही आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. काल शनिवारी मध्यरात्री मराठा आरक्षण उपसमीतची बैठक पार पडली.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीष महाजन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. आज सकाळी या प्रश्नासंदर्भात उपसमितीची बैठक पार पडली असल्याची माहिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.





