नळदुर्ग : नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मतदारांना संदेश दिला. “माझ्या हातात राज्याची तिजोरी आहे. तुम्ही माझ्या घड्याळ चिन्हाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तर बारामतीप्रमाणेच नळदुर्गचं रूप पालटून टाकेन,” असा विश्वास त्यांनी दिला. अजित पवार पुढे म्हणाले, “मी बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला, पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला. आता नळदुर्गची वेळ आली आहे. मी बोलतो ते करतो, शब्दाचा पक्का आहे. अर्थमंत्री म्हणून या भागाकडे मी बारकाईने लक्ष देईन.” लाडकी बहीण योजना बंद होणार नाही “लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. कोणीही अफवा पसरवू देऊ नका,” असे स्पष्ट करताना पवारांनी महायुती सरकारच्या योजनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. अल्पसंख्याकांना मंत्रीपद, सर्वधर्म समभाव “कोणत्याही पक्षाने अल्पसंख्याक समाजाला मंत्रीपद दिले नव्हते, पण मी दिले,” असे सांगताना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींची नावे घेऊन सर्वधर्म समभावाची भूमिका अधोरेखित केली. बकरी ईदच्या वेळी कुरेशी समाजावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वतः बैठक घेऊन प्रश्न सोडवल्याची आठवणही त्यांनी करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला महत्त्व “लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या, ही निवडणूक तुमच्या दारातील प्रश्न सोडवणारी आहे. यशवंतराव चव्हाणांनी सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या,” असे सांगत त्यांनी मतदारांना जागरूक केले. “कंत्राटदारांना तिकीट देऊ नका” “काही कंत्राटदार फक्त पद मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि नंतर स्वतःच कामे घेतात. यामुळे लोकांचे खरे प्रश्न सुटत नाहीत,” असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला. नळदुर्ग शहराचा पोलिस विभागातील ‘लाल अक्षरातला’ इतिहास बदलण्याची गरज असल्याचे सांगताना त्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करू, असा दावा अजित पवार यांनी केला. या सभेला प्रचंड गर्दी होती आणि अजित पवारांच्या भाषणाने कार्यकर्ते उत्साहात आले. नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) घड्याळ चिन्हावर विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.