Healthy Breakfast: मधुमेह असेल तर नाश्त्यात ‘या’ पदार्थांना द्या प्राधान्य; रक्तातील साखर राहील नियंत्रणात
Healthy Breakfast मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ औषधे पुरेशी नसतात. संतुलित आहार, योग्य नाश्ता, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणेही तितकेच आवश्यक आहे.

Healthy Breakfast: मधुमेह हा आजच्या काळातील सर्वात सामान्य जीवनशैलीशी संबंधित आजारांपैकी एक आहे. या आजारात औषधांसोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांनाही तितकेच महत्त्व आहे. विशेषतः दिवसाची सुरुवात म्हणजेच नाश्ता योग्य असेल, तर रक्तातील साखरेची पातळी दिवसभर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. श्री चैतन्य क्लिनिकचे डॉ. चैतन्य देशमुख (BAMS, जनरल फिजिशियन) सांगतात की, मधुमेह असलेल्या व्यक्तीने नाश्ता करताना फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असलेले पदार्थ निवडावेत. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होत नाही आणि शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
डॉक्टर सांगतात की, ओट्स किंवा दलिया हा मधुमेहींसाठी उत्तम नाश्ता ठरू शकतो. ओट्समध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ते हळूहळू पचतात आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढू देत नाहीत. त्यात हंगामी भाज्या घालून अधिक पौष्टिक नाश्ता तयार करता येतो.
अंडी हा देखील नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. अंड्यात उच्च दर्जाची प्रथिने आणि निरोगी चरबी असते. उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा कमी तेलात केलेली भुर्जी अशा स्वरूपात त्याचा आहारात समावेश करता येतो. प्रथिनांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
हिरव्या पालेभाज्या आणि इतर भाज्या नाश्त्यात समाविष्ट करणेही फायदेशीर ठरते. टोमॅटो, कांदा, पालक, मेथी किंवा इतर हंगामी भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetic-Friendly Breakfast
डॉ. देशमुख यांच्या मते, कडधान्ये आणि डाळी देखील नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. मोड आलेली कडधान्ये, हरभरा, मसूर किंवा मूग यांमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हे पदार्थ पचनासाठीही चांगले मानले जातात.
फळे खाणेही महत्त्वाचे आहे, मात्र ती योग्य प्रमाणात खावीत. सफरचंद, संत्रे, डाळिंब यांसारखी फायबरयुक्त फळे मधुमेहींसाठी अधिक चांगली मानली जातात. मात्र अतिगोड फळांचे सेवन किती करावे, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
कमी चरबीचे दूध वापरून तयार केलेला मिल्कशेक देखील काही वेळा नाश्त्याचा भाग होऊ शकतो. मात्र त्यामध्ये अतिरिक्त साखर घालू नये. तसेच भाजलेले काजू किंवा इतर सुका मेवा मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला निरोगी चरबी, प्रथिने आणि ऊर्जा मिळते.
डॉक्टर सांगतात की, मधुमेहींनी काही पदार्थ शक्यतो टाळावेत. साखर, मिठाई, गोड पेये आणि जास्त साखर असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात. तसेच पांढऱ्या पिठाची ब्रेड, मैद्याचे पदार्थ आणि पास्ता यांचे सेवन मर्यादित ठेवावे. त्याऐवजी संपूर्ण धान्यापासून तयार केलेले पदार्थ निवडावेत. जास्त तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थही शक्यतो टाळावेत.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ औषधे पुरेशी नसतात. संतुलित आहार, योग्य नाश्ता, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणेही तितकेच आवश्यक आहे. कोणताही नवीन आहार किंवा सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
योग्य नाश्त्याची सवय लावल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे सोपे होते आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासही मदत मिळू शकते.





