‘निजामुद्दीन’च्या कार्यक्रमाला गेला असाल तर पालिकेला माहिती द्या – आयुक्त हर्डीकर

पिंपरी – दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले अनेकजण माहिती लपवित आहेत. त्यामुळे शहरात करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या नागरिकांनी स्वत: पुढे येत महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
याबाबत हर्डीकर यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, दिल्लीतील कार्यक्रमाला शहरातील अनेक जण हजर होते. त्यातील काहींना करोनाची बाधा झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेले काही जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यानंतरही कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले अनेकजण माहिती लपवित आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
माहिती लपविल्यामुळे शहरातील नागरिकांसह आपलेही कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी स्वत: पुढाकार घेऊन महापालिकेच्या रुग्णालयाला माहिती द्यावी. आपण पुढाकार घेतल्यास करोनाला नियंत्रणात आणण्यात आपणास यश येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.





