आता ‘या’ वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही; सरनाईकांचा कडक आदेश

मुंबई : प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आता राज्यातील प्रत्येक वाहनाला वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) असणे बंधनकारक असेल. जर वाहनाचे PUC वैध नसेल, तर त्या वाहनाला पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. या “No PUC, No Fuel” योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयात 10 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
काय आहे निर्णय?
- राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनांचे क्रमांक स्कॅन केले जातील. यामुळे वाहनाचे PUC वैध आहे की नाही, याची तात्काळ पडताळणी होईल. जर PUC वैध नसेल, तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही.
- वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपावर तात्काळ PUC काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे वाहनचालकांना त्वरित प्रमाणपत्र मिळू शकेल.
- प्रत्येक PUC ला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) देण्यात येणार आहे. यामुळे प्रमाणपत्राची वैधता वेळोवेळी तपासणे सोपे होईल आणि बनावट PUC ची निर्मिती रोखली जाईल.
- अवैध पद्धतीने PUC काढणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बनावट प्रमाणपत्रांच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्याचे उद्दिष्ट आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “भविष्यातील पिढ्यांना प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने काही निर्बंध स्वीकारणे गरजेचे आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी वैध PUC अनिवार्य आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणासह कायदा आणि सुव्यवस्थाही राखली जाईल.”





