Petrol-Diesel : शहरातील पेट्रोल पंपांवर नागरीकांची गर्दी ! प्रशासनाने स्पष्टच सांगितलं….
भीतीमुळे जिल्ह्यात नागरिकांनी इंधन खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. नागरिक कडक उन्हाची पर्वा न करता आपली वाहने घेऊन पेट्रोल पंपांवर रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसून आले.

Petrol Diesel – नागपूर प्रशासनाने मंगळवारी इंधनाच्या तुटवड्याबाबतच्या अफवांचे खंडन केले आहे. शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली असतानाच प्रशासनाने नागरिकांना जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले.
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक इंधन पुरवठ्याचा निर्माण झालेल्या गंभीर संकटाचा परिणाम म्हणून इंधनाच्या तुटवड्याची भीती निर्माण झाली होती.
याच भीतीमुळे जिल्ह्यात नागरिकांनी इंधन खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. नागरिक कडक उन्हाची पर्वा न करता आपली वाहने घेऊन पेट्रोल पंपांवर रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसून आले.
या परिस्थितीची दखल घेत जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी एक निवेदन जारी केले. त्यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आणि प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ आपल्या गरजेनुसारच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या उपलब्धतेबाबत केंद्र आणि राज्य सरकारने स्पष्ट माहिती दिली असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.





