Savitri Thakur : संयुक्त राष्ट्रांनी हिंदीला मान्यता दिल्यास ती जागतिक भाषा बनेल; महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी व्यक्त केले मत

न्यूयॉर्क : जवळपास ६०० दशलक्ष लोकांची बोली भाषा असलेल्या हिंदी भाषेला संयुक्त राष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनने गुरुवारी येथे त्यांच्या परिसरात बहुभाषिकता आणि परदेशात हिंदीचा प्रचार या संकल्पनेसह जागतिक हिंदी दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी असलेल्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी आपल्या भाषणात भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक सामाजिक रचनेचा घटक आहे यावर प्रकाश टाकला. हिंदीला अधिक लोकप्रिय भाषा बनवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत आणि संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिल्यास ती जागतिक भाषा बनेल, असे त्यांने नमूद केले. तब्बल ६० कोटी भाषिकांसह हिंदी भाषा संयुक्त राष्ट्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक संप्रेषण विभागाच्या अंडर-सेक्रेटरी-जनरल मेलिसा फ्लेमिंग म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेचा समावेश गैर-अधिकृत भाषांच्या यादीत करण्यात आला आहे., असे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी. हरीश यांनी अधोरेखित केले. या शिवाय, संयुक्त राष्ट्रांमध्ये, भारताने हिंदीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बातम्यांचा प्रचार करण्यासाठी सुमारे ७ दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि लोकप्रियता वाढवण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी भारत सरकारने १० जानेवारी २००६ रोजी विश्व हिंदी दिवस सुरू केला. तेव्हापासून, दरवर्षी जगभरात जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.





