प्राचार्यांची बदली रद्द न झाल्यास उपोषण करणार

मंचर येथील आवटे कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचा इशारा
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांची बदली रद्द करण्याबाबतचे निवेदन विद्यार्थी संघटनेने कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी यांना दिले आहे. बदली शनिवार (दि.15) पर्यंत रद्द न केल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे दीड वर्षांपासून प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड हे कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, पाण्याची नवीन टाकी, तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन, कॉलेज परिसरात कांद्याचे तसेच बटाट्याचे उत्पादन करून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक सहकार्य केले आहे. प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड यांची बदली रद्द होण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी यांना निवेदन दिले आहे.





