नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ७ ते १० मे दरम्यान केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे ३५-४० सैनिक ठार झाल्याची माहिती लष्करी संचालक (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानच्या आक्रमकतेच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली. घई यांनी स्पष्ट केले की, “ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हा होता. ७ मे रोजी केवळ दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष्य केले गेले, पाकिस्तानच्या नागरी किंवा लष्करी संरचनांना कोणतेही नुकसान झाले नाही.” पाकिस्तानने ७ मे च्या संध्याकाळी मानवरहित हवाई वाहने (UAV) आणि ड्रोनद्वारे भारताच्या लष्करी आणि नागरी क्षेत्रांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. तीन ड्रोन जमिनीवर पडले, ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले. ८ आणि ९ मे रोजी पाकिस्तानने पुन्हा विमाने आणि ड्रोन पाठवले, तसेच नियंत्रण रेषेवर (LoC) युद्धबंदीचे उल्लंघन केले, ज्यामुळे तीव्र चकमक झाली. वायुसेनेचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या चकला, रफीकी, रहीम यार खान, सरगोधा, भुलारी आणि जैकबाबाद येथील हवाई तळ, कमांड सेंटर आणि हवाई संरक्षण यंत्रणांवर योजनाबद्ध हल्ले केले. “आमचा उद्देश कोणाला मारणे नव्हता, तर दहशतवादी तळ निष्क्रिय करणे हा होता. भारताने या कारवाईद्वारे पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, कोणतीही आक्रमकता खपवून घेतली जाणार नाही. DGMO घई यांनी युद्धबंदीचे पालन करण्याचे आवाहन करताना, पुढील उल्लंघनांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ (७ मे २०२५) ते युद्धबंदी (१० मे २०२५) दरम्यान भारताला लक्षणीय सैनिक आणि नागरी नुकसान सहन करावे लागले. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाच भारतीय सैनिक शहीद झाले. पाकिस्तानच्या प्रत्युत्तर हल्ल्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये १२ नागरिक आणि एक सैनिक शहीद. नियंत्रण रेषेवरील गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. एकूण, या कालावधीत भारताचे ५१-५६ नागरिक आणि सहा सैनिक शहीद पडले असल्याचे सांगितले जात आहे. युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे तणाव कायम असून, भारताने कठोर प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्येही 50हून अधिक नागरिक मृत झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.