पुणे जिल्हा | …नाही तर आयती जागा महाविकास आघाडीकडे

वडापुरी, {विजय शिंदे} – लोकसभा निवडणुकीतील चुका महायुतीने सुधारल्या नाहीत तर, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही लोकसभेसारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद महायुतीतील जागावाटप या गोष्टीकडे लक्ष देऊन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना अनेक विधानसभा मतदारसंघात लक्ष घालावे लागणार आहे.
महायुतीमध्ये कळीचा मुद्दा असणारा बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभेचा तिला सोडवण्याचे मोठे कठीण आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या समोर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील. त्यांचा तो निर्णय मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मान्य केलेले आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले असून अप्रत्यक्षपणे त्यांनी इंदापूरच्या जागेवर दावा केला आहे.
तर इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही सध्या बरोबर आहोत. आम्ही एकत्र आहोत, मीडियाने आमच्यात उगाच भांडणे लावू नयेत, अशी भूमिका आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना २६ हजार मताचे मताधिक्य इंदापूर तालुक्यातून मिळाले आहे. त्यामुळे इंदापुरात विधानसभेसाठी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली जाणार, हे मात्र निश्चित आहे.अशावेळी महायुतीतील वादाकडे पवार यांचे लक्ष असणार आहे.
महायुतीत वाद झाल्यास इंदापूरची लढत तिरंगी होईल व याचा निश्चितच फायदा महाविकास आघाडीला होईल महायुतीसाठी हक्काची समजली जाणारी इंदापूरची जागा अडचणीत येऊ नये यासाठी पक्ष नेतृत्व दोन्ही नेत्यांची समजूत कशी काढणार.? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मला राज्य ताब्यात घ्यायचा आहे…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या वेळी इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला राज्य ताब्यात घ्यायचे आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरची जागा ही लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे.
विधान परिषद, राज्यसभा तोडगा..
आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पक्ष नेतृत्व हे विधान परिषद व राज्यसभेचा तोडगा काढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हर्षवर्धन पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात तर आमदार दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. त्यामुळे महायुतीमधील इंदापूरच्या जागेचा वाद शहा, फडणवीस व पवार मिटवतील अशी शक्यता आहे.





